
पर्व पहिले : दुर्ग-दुर्गेश्वर रायगड
गडभ्रमंती, भटकंती, प्रवास आणि वारसा पदयात्रा करत करत दहाव्या वर्षांत कधी आले, कळलेच नाही. मागे वळून पाहताना जाणवतं—नुसत्या मजा-मस्तीपासून सुरू झालेल्या या प्रवासाने कधी संवेदनशीलतेचे, जबाबदारीचे आणि स्वतःवरील दृढ आत्मविश्वासाचे रूप धारण केले, याची कल्पनाही नव्हती. The Voyager (द व्हॉयेजर) च्या गेल्या नऊ वर्षांच्या वाटचालीत, युनेस्कोने घोषित केलेली जागतिक वारसा स्थळे, महाराष्ट्रातील गड-किल्ले, तसेच विविध धर्मांची अनोखी मंदिरे अनुभवण्याची संधी मिळाली. केवळ भेट देणे एवढ्यावर न थांबता, त्या स्थळांचा इतिहास समजून घेणे, त्यांचे जतन व्हावे यासाठी प्रयत्न करणे आणि हा वारसा जिवंत ठेवण्यासाठी मुंगीचा वाटा उचलणे—हे समाधान मनाला फार सुखावून जाते. या प्रवासात देश-विदेशातून आणि विविध राज्यांतून सहभागी झालेले सहप्रवासी आज या अतुलनीय वारशाचे खरे पाईक बनले आहेत. हा प्रवास अखंड सुरू राहो आणि हे कार्य असेच अविरत घडत राहो, हीच मनापासूनची इच्छा. आपल्या संस्कृतीनुसार, कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी इष्टदेवतेचे स्मरण करून आशीर्वाद घेणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच, प्रजेला आपली मानणाऱ्या, मुलुखाचे रक्षण करणाऱ्या आणि मानवरूपी देवतेसमान असलेल्या जाणत्या राजांचे—छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन, २६ जानेवारी २०१७ रोजी या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. वर्षातून किमान एकदा तरी एखाद्या ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देऊन आपला इतिहास समजून घेण्याचा हा स्तुत्य संकल्प तेव्हाच आकाराला आला. माझा रायगडाशी पहिला परिचय झाला तो माझ्या प्राथमिक शिक्षिकेच्या नजरेतून. मी दुसरी-तिसरीत शिकत असताना शिंगणे टीचर रायगडच्या सहलीला गेल्या होत्या. त्या परत आल्यानंतर त्यांनी वर्गात रायगडचा अनुभव सांगितला — रोपवेने गडावर कसे पोहोचलो, हे समजावून सांगताना त्यांनी फळ्यावर लोखंडी दोरांच्या रेषा काढून त्यावर एक चौकोनी डबा रेखाटला. त्या दिवशी ‘रोपवे’ म्हणजे काय आणि ते कसे काम करते, हे समजले आणि मनात एक कुतूहल रुजले—एक दिवस रोपवेने रायगडावर जायचेच! तरीही आजपर्यंत तसे झाले नाही, कारण मित्र-मैत्रिणींसोबत पायी रायगड सर करण्याची मजा काही औरच आहे. २०१७ हे माझ्या महाविद्यालयीन जीवनाचे शेवटचे वर्ष होते. कॉलेज सुटणार या विचाराने मन थोडे हळवे झाले, कारण याआधी शाळा सुटल्यानंतर मित्र-मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरल्याचा अनुभव घेतला होता. तेव्हा मनात विचार आला—वर्षातून एकदा तरी शाळेतील मित्र-मैत्रिणी एकत्र यावेत, यासाठी काहीतरी उपक्रम सुरू करायला हवा. मग प्रश्न पडला—२६ जानेवारीच का? कारण शाळा सुटल्यानंतर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीचा तो शालेय उत्साह, ती मजा हरवून जाते. तीच भावना, तोच उत्साह टिकवून ठेवण्यासाठी २६ जानेवारीची तारीख निश्चित झाली. शाळेत जसे प्रजासत्ताक दिनी सगळे एकसारख्या, नीटनेटक्या गणवेशात यायचो, तसाच या सहलीलाही सर्वांसाठी एकच ‘गणवेश’ असावा, या कल्पनेतून चार वेगवेगळ्या डी-मार्टमधून सर्वांच्या साइजचे, एकाच रंगाचे टी-शर्ट्स घेतले. प्रत्येकी सुमारे ५०० रुपये खर्च येईल, अशा साध्या हिशेबाने सहलीचे नियोजन केले. कॉलेजचे शेवटचे वर्ष, हातात नोकरी नाही आणि घरून मिळणाऱ्या मोजक्या पैशांत हे सगळं जमवणं तेव्हा खरंच अशक्यप्राय वाटत होतं. सगळी मित्रमंडळीही समवयस्क आणि समान परिस्थितीत जगणारी. पण इच्छा, उत्साह आणि थोडीशी भीत-भीत केलेली हिंमत यांच्या जोरावर… तो पहिला रायगड सर झाला. या पवित्र भूमीवर आम्ही १४ मित्र-मैत्रिणी एकत्र जमलो होतो. गप्पा-गोष्टी करत, इतिहास समजून घेत आणि गडावरील स्वच्छतेची जबाबदारी मनापासून स्वीकारत, आम्ही संपूर्ण रायगड फिरलो. प्रत्येक पावलागणिक इतिहास जिवंत होत असल्याचा अनुभव येत होता—जणू भिंती, वाटा आणि वारा सुद्धा काहीतरी सांगू पाहत होते. रायगडावरील गंगासागराच्या दक्षिणेस उभे असलेले द्वादशकोनी दोन उंच मनोरे विशेष लक्ष वेधून घेतात. जानेवारी महिन्यात त्यांच्यावरचे गवत हळूहळू वाळून सोनेरी छटेत रंगू लागते. त्या क्षणी टिपलेले छायाचित्र आजही माझ्या मनात खास स्थान राखून आहे. इंटरनेटवर या मनोऱ्यांची हिरव्या गवतात न्हालेली, पावसाळ्यातील असंख्य चित्रे पाहिली होती; ती प्रत्यक्ष पाहण्याची ओढ होती. पण निसर्ग जेव्हा आपल्या छटांमधून एखाद्या जागेचे सौंदर्य नव्याने उलगडतो, तेव्हा तो अनुभव अलौकिक आणि शब्दांच्या पलीकडचा ठरतो. टकमक टोक, गंगासागर तलाव, बाजारपेठ, जगदीश्वराचे मंदिर, राजवाडा परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ—हे सर्व पाहून मन भरून आले. इतिहासाशी प्रत्यक्ष संवाद साधल्यासारखे वाटले. या अविस्मरणीय भेटीचा समारोप आम्ही राष्ट्रगीत गाऊन केला.
Dipali SindhuTej
1/12/2026
Coming soon..........
